14/03/2026
*अंतिम ध्येय*
अंतिम ध्येय असे असावे कि जे सहज साध्य करता येऊ नये, कारण जर का ते ध्येय गाठले तर पुढे काय ? हा मोठा प्रश्न उभा राहील . अती उच्च ध्येय ठेवले तर , ‘ अती तेथे माती ’ या न्यायाने ते देखील चुकीचे ठरेल . असं ही म्हटल जात कि ध्येय टप्पेदार असावे . एकेक टप्पा गाठत पुढे जाता येते आणि ध्येय गाठल्याचे समाधान देखील पदरात पडते .
पण अतीपणा केल्याशिवाय कांही साध्य होत नाही हे देखील तितकेच खरे आहे . अतीपणा लोकांच्या लगेच लक्षात येतो . कदाचित तुमचे म्हणणे लोकांना पटवून देण्यासाठी असा अतीपणा कांही अंशी गरजेचा देखील असतो .
मग असा विचार येतो कि लोकांना कळण्यासाठी किंवा मला प्रसिद्धी मिळण्यासाठी मी असा वागतो आहे का?
या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नाही असे आहे .
मग मला असे वागवेसे का वाटत आहे ?
कारण मी स्वत:साठी ठरवले आहे कि “ मी कचरा तयार करणारी व्यक्ती होणार नाही आहे .” हे मी माझ्यापुरते ठरवले आहे आणि गेली पंचवीस वर्षे मी तसा वागतो आहे आणि ‘शून्य कचरा’ या संकल्पनेचा प्रचार करत आहे . माणूस या प्राण्याला फक्त उत्श्वास ,मल आणि मुत्र ह्या तीनच गोष्टी टाकायची निसर्ग देवाने परवानगी दिलेली आहे . असे माझे ठाम मत आहे .
वीस पंचवीस वर्षानंतर मी जेव्हा माझ्या वागण्याकडे एका तपासनिसाच्या नजरेने बघू लागलो तेव्हा मला माझ्या वागण्यातील त्रुटी स्पष्ट दिसू लागल्या .
जेवण झाल्यावर माझ्या ताटात मी कांहीही टाकत नाही असे मी म्हणत होतो . हे जर खरं होता तर मग माझे ताट घासावे का लागते ? माझ्या ताटाची गणना उष्ट्या खरकट्या भांड्यात का केली जाते ?
मी माझे वापरलेले ताट कोणालातरी घासायला देतो म्हणजे मी ताटात कांहीतरी टाकतो असेच झाले ! शिवाय वापरून झालेल्या , उपभोग घेतलेल्या वस्तूचे व्यवस्थापन दुसऱ्याला करायला लावणे हा एकप्रकारे मी अन्यायच करत होतो . याची मला जाणीव झाली आणि मला माझ्या भूतकाळातील एक सत्य घटना आठवली .
नाशिकच्या पांडवलेण्या समोर एक भव्य जैन मंदिर आहे .या जैन मंदिरात मध्यानीच्या समयाला जे कोणी दर्शनासाठी येतात त्यांना प्रसाद म्हणून पोटभर जेवण दिले जाते असे . आम्हीपण असेच त्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . वेळ दुपारची होती . मंदिराचा आवारात पंगती बसल्या होत्या . दर्शनाला येणारे सर्व लोक प्रसाद म्हणून जेवत होते . आम्ही देखील त्या प्रसादरूपी भोजनाचा आस्वाद घेतला . जेवण झाल्यावर आपापली ताट वाटी स्वच्छ करून परत द्यायची असा तेथील नियम होता . पण त्यासाठी तेथे ताटल्या धुण्यासाठी वेगळी व्यवस्था नव्हती . मग ताट वाटी स्वच्छ कशी करायची? तर त्यासठी तेथील साधक सांगत होते कि तुम्ही तुमचे हात ताटातच धुवा . हात धुतलेल्या ताटात पडलेल्या पाण्याने ताट स्वच्छ धुवा आणि ते पाणी तुम्ही तीर्थप्रसाद म्हणून प्राशन करा .
हात धुणे , ताट वाटी स्वच्छ करणे , तहान भागवणे ह्या तीनही क्रिया एका क्रियेत साध्य होत होत्या .
हा तिथला नियम होता आणि सर्व हौसे गौसे नवसे आणि भक्त मंडळी तो तक्रार न करता पळत होते . आम्ही देखील नियमाप्रमाणे ताटात हात धुतले . तेच पाणी प्यायलो . असे दोनतीन वेळा केल्यावर ताट लख्ख स्वच्छ झाले . तेच पाणी प्यायल्या मुळे तहान देखील भागली . सर्वचजण नियमा प्रमाणे वागत होते त्यामुळे आपण काहीतरी गैर करत आहोत असे कुणालाच वाटत नव्हते .
मला ही घटना आठवली आणि ‘शून्य कचऱ्याचे’ पुढील ध्येय गाठायची वाट सापडली .
आता मी ताटातच हात धुतो आणि तेच पाणी पिऊन तृप्त होतो .
फक्त हे मी माझ्या घरी करू शंकतो . उपहारगृहात किंवा कोणाकडे जेवायला गेल्यावर मला असे हात धुता येत नाहीत कारण मी जर घरी धुतो तसे जेवण झाल्यावर ताटात हात धुतले तर आजूबाजूच्या लोकांना विचित्र वाटेल कदाचित किळस येईल कदाचित माझा तो अती आगाऊपणा देखील वाटेल.
तर असा किळसवाणेपणा किवा अगाऊपणा जेव्हा जगमान्य होईल तो सुदिन यायची वाट पहायची आणि तो पर्यंत ‘शून्य कचरा’ या संकल्पनेचा प्रचार करायचा. त्या शिवाय पर्याय नाही .
**************************
https://youtu.be/YKG6Qi3O2eo?feature=shared
***************
कौस्तुभ ताम्हनकर
९८१९७४५३९३
[email protected]
***************
भेटा /visit :- www.zerogarbage.co.in
***************
भेटा / you tube channel
https://youtube.com/?si=I75FP06aGxYgIzVC
*****************
मुद्दा पटल्यास लेख नावासहित अग्रेषित (Forward) करावा .
*************************
Toothpest we purchase but we can not use it completely. Normally 5 to 10 percent pest is thrown in to garbage when we throw used Toothpest in dust bin.This v...